पालघर: येथील गॅलेक्सी रासायनिक कारखान्यात काल रात्री झालेल्या भीषण स्फोटात २ कामगार ठार झाले आहेत. तर तीनजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तासाभराच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र, लॉकडाऊन असताना हा कारखाना सुरू होताच कसा? असा प्रश्न निर्माण झाला असून जिल्हा प्रशासनाला त्याची माहिती नव्हती काय? असा सवालही केला जात आहे. बोईसर येथील एमआयडीसीमधील प्लॉट नंबर ए-३मधील गॅलेक्सी सरफॅक्टटन्स या कारखान्यात रात्री १२ वाजता अचानक हा स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूचा ५ किलोमीटरचा परिसर हादरून गेला. अचानक झालेल्या या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे परिसरातील लोकही हादरून गेले. अग्निशन दल आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर आग विझवण्याचं काम केलं. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली. या आगीत दोनजण ठार झाले आहेत. तर तिघा जखमींवर कारखान्याच्याच दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3b7OJaf
via IFTTT


No comments:
Post a Comment