३२८ नवीन रुग्णांचे निदान; दिवसभरात ११ जणांचा मृत्यू
मुंबई - राज्यातील नव्या रुग्णांची संख्या घटत असल्याचे चित्र निर्माण होत असतानाच आज राज्यात कोरोनाबाधित ३२८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. आज दिवसभरात ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आत्तापर्यंत राज्यभरात ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. आज राज्यात ११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
राज्यात सध्या एकूण ३०७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७, ४६८ नमुन्यांपैकी ६३, ४७६ जणांचे कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८२,२९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात ११ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २११ झाली आहे. (या पूर्वी ११ एप्रिलला कळवलेला एक मृत्यू कोरोना निगेटिव्ह असल्याचे मुंबई मनपाने कळवल्याने सदर मृत्यू एकूण मृत्यूमधून वगळण्यात आला आहे). आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईतील पाच, पुण्यातील चार, औरंगाबादमधील एकाचा आणि ठाण्यातील एकाचा समावेश आहे. त्यात ६ पुरुष तर ५ महिला आहेत. त्यामध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील पाच रुग्ण आहेत तर सहा रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ९ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
‘टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती’
मुंबई - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी टाळेबंदीची मुदत 3 मेपर्यंत वाढवण्यात आली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमांसारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरू राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरू व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी लॉकडाऊनची मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर काही बाबींना मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली आहे. सोमवारी 20 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
देशात जाहीर टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शुक्रवारी (ता. 17) मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. मार्गदर्शक नियमावलीनुसार ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसाय, व्यापारी आस्थापनांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी देण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवण्यात आली असली, तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यापुढेही नियमित सुरू राहील, त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला. नागरिकांना, कोरोना प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबावे, घराबाहेर पडू नये, सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.
ऑनलाईन शिक्षणास प्रोत्साहन
अंगणवाड्या बंद असल्या तरी बालकांना पोषण आहार घरपोच दिला जाणार आहे. शाळा, महाविद्यालये बंद असली तरी ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यास सांगण्यात आले आहे. बॅंका, वित्तीय संस्थांचे व्यवहार सुरू राहणार असले, तरी नागरिकांनी तिथे गर्दी करू नये, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
from News Story Feeds https://ift.tt/2VyhPJa
via IFTTT


No comments:
Post a Comment