रावेर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतात काम नाही की मासे विक्रीही नाही. घरात अठराविश्वे दारिद्रय, अशा स्थितीत दारात एका सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते किराणा सामानाचे मोठे गाठोडे घेऊन पोचतात. पण ते नम्रपणे नाकारून चार घरांच्या पलीकडे खऱ्या गरजूंना देण्याची विनंती झोपडीत राहणाऱ्या आदीवासी कुटूंबाने केली.
नक्की पहा - यवतमाळच्या त्या क्वारंटईन महिलेली प्रसुती; कन्यारत्न सुखरूप
कोरोना व्हायरसमुळे सर्वांचे रोजगार हिरावून घेतले आहेत. यामुळे हातावर पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजूंसाठी काही सामाजिक संस्था जेवणाचे पार्सल किंवा किराणा सामान पोहचवत आहेत. अशा स्थितीत आदिवासी भागातील आदिवासी कुटूंबाने संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आणलेला किराणा नाकारून अन्य गरजूंना देण्याचे सांगितले.

पहिल्याच घरात आला अनुभव
सध्या असंख्य सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते गोरगरिबांना मदत करीत आहेत. रावेर येथील किल्ला प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी देखील जीवनावश्यक वस्तू घेऊन सातपुड्याच्या कुशीतील गारबर्डी हे दुर्गम गांव गाठले. एकीकडे विशाल पसरलेले सुकी मध्यम प्रकल्पाचे पाणी, विरळ जंगल आणि टेकडीवर ही दहा- बारा झोपड्यांची वस्ती. धरणातील मासे विकून आणि कोरडीची शेती करून कशीबशी आपली गुजराण करणारा हा आदिवासी समाज. म्हणून या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हे गाव निवडले.
भाऊ रेशनकार्ड आहे आमच्याकडे
तांदूळ, डाळ, तेल, साखर आदी साहित्य त्यांनी घेतले. प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी त्यांना प्रत्येकी दहा किलो गव्हाचे पार्सल वाटप करण्यासाठी दिले होते. गारबर्डी गावात वाटप सुरू करताच पहिल्याच झोपडीतील माणूस बाहेर आला. "माझ्याकडे रेशन कार्ड आहे, मला मिळेल तिथून धान्य पण शेजारच्याकडे रेशनकार्ड नाही; हे गाठोडे त्यांना द्या, त्यांना याची खरी गरज आहे' असे सांगून त्याने मदत नम्रपणे नाकारत चार घरांच्या पलीकडील घरी ती द्यायला लावली. तसेच या वस्तीतील ज्यांना खरी गरज आहे अशी घरे दाखवून अन्य शिल्लक साहित्य इतर गरजूंना देण्याची विनंती त्यांनी केली.
मदतकर्तेही अवाक
आवश्यकता नसूनही रडगाणे गात आलेली मदत घेत रहायची आणि साठा करत रहायचा अशी शहरी मानसिकता असलेल्यांना या अशिक्षित, आदिवासी बांधवांनी त्याग आणि माणुसकीचा जणू धडाच घालून दिला. मदत देणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील हा एक विलक्षण अनुभव देणारा प्रसंग सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या एका आदिवासी दुर्गम खेड्यात आला.
from News Story Feeds https://ift.tt/3euV69G
via IFTTT


No comments:
Post a Comment