मुंबई: लॉकडाऊनमुळे गंभीर गुन्हे मोठ्या प्रमाणावर कमी झाले असले तरी किरकोळ गुन्हे अद्यापही घडताना दिसत आहेत. असल्यामुळे एका हॉटेलमधून ऑनलाइन जेवण मागवणे एका महिलेला महागात पडलं असून तिला ५० हजार रुपयांना गंडवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका ४९ वर्षीय महिलेने सोशल मीडियाववर एका हॉटेलची जाहिरात पाहिली होती. त्यानंतर तिने या जाहिरातमधील क्रमांकावर फोन लावून जेवणाची ऑर्डर घेण्यास सांगितले. मात्र हॉटेलच्या कर्मचाऱ्याने एक लिंक पाठवतो त्यावर नाव, पत्त्यासह तुमची डिटेल्स भरा असं तिला सांगितलं. त्यामुळे पुढच्यावेळी तुम्ही ऑर्डर केल्यास आम्हाला तुमचं नाव विचारण्याची गरज पडणार नाही आणि काही मिनिटातच जेवणाची ऑर्डर तुमच्या दारात असेल, असं या कर्मचाऱ्याने सदर महिलेला सांगितलं. या महिलेने लिंक ओपन केल्यावर त्यात डेबिट कार्डची माहितीही विचारण्यात आलेली तिला दिसली. मात्र या महिलेने ही संपूर्ण माहिती भरली. त्यानंतर हॉटेलमधून पुन्हा फोन आला आणि तुमच्याकडे एक चार अंकी नंबर कन्फर्मेशनसाठी येईल म्हणून सांगितलं. हा नंबर भरल्यानंतर काय काय ऑर्डर पाहिजे ते सांगा असं या कर्मचाऱ्याने सदर महिलेला सांगितलं.
त्यानंतर या महिलेने जेवणाची यादी तयार करेपर्यंत तिला एकामागोमाग पाच एसएमएस आले. त्यात तिच्या खात्यातून ४९ हजार ९५४ रुपये काढण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं या महिलेच्या लक्षात आलं आणि तिने तात्काळ एलटी मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदवला. गुन्हे अन्वेषण विभागाची टीमही याप्रकरणाची चौकशी करत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ad4ZFS
via IFTTT


No comments:
Post a Comment