अहमदनगर: आजारी आईच्या औषधांसाठी महापालिकेच्या हेल्पलाइनला फोन लावूनही हेल्पलाइन बिझी येत असल्याने मुकुंदनगर येथील शाहरूख सिद्दीकी या तरुणाने थेट राहुल द्विवेदी यांच्याकडे ट्विटरवरून संपर्क साधत त्यांच्याकडे औषधांची मागणी केली. त्यावर द्विवेदी यांनीही लगेचच त्याला रिप्लाय देत अवघ्या तासाभरातच सिद्दिकी याला प्रशासकीय यंत्रणेमार्फत औषधांचा पुरवठा केला. द्विवेदी यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुकुंदनगरमध्ये करोना’बाधित सापडल्याने ‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा भाग १० एप्रिलपासून सील करण्यात आलेला आहे. हा भाग ‘हॉटस्पॉट’ म्हणून घोषित करून या भागातील अत्यावश्यक सेवेसह सर्व सेवा १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. येथील किराणा दुकाने, औषध दुकाने व अन्य दुकानेही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे या भागांतील दैनंदिन गरजांच्या पूर्ततेची जबाबदारी महापालिकेवर देण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारपासून त्याची सुरुवात झाली. महापालिकेने अत्यावश्यक सेवांची मागणी नोंदविण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक दिले आहेत. त्यामुळे या हेल्पलाइन क्रमांकावर औषधासाठी मुकुंदनगर येथील रहिवासी शाहरूख सिद्दीकी हे रविवारी सायंकाळी संपर्क करीत होते. जवळपास दोन तास संपर्क करून देखील हेल्पलाइन बिझीच येत होती. अखेर सिद्दीकी यांनी रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी आपल्या अडचणीबाबत ट्विट करीत ते ट्विट जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना टॅग केले. द्विवेदी यांनीही तातडीने ट्विटची दखल घेऊन त्वरित रिप्लाय करीत प्रिस्क्रिप्शन मागितले व संबंधित औषधे प्रशासकीय यंत्रणेमार्फत सिद्दीकी यांच्यापर्यंत पोहचवली.
सातत्याने हेल्पलाइन बिझी येत असल्याने ट्विटरच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क केला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली व प्रशासकीय सेवेमार्फत पुढील एक तासात औषधे पोहच झाली, अशी माहिती देतानाच जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाचे सिद्दीकी यांनी आभार मानले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RxG0WW
via IFTTT


No comments:
Post a Comment