मुंबई: लॉकडाऊननंतर उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांमधील साखळी खंडित झाल्यामुळं मुंबईतील जाणवू लागला आहे. नवजात बालकांसाठी लागणाऱ्या वस्तूही मेडिकलमध्ये मिळेनाशा झाल्या आहेत. अंधेरी केमिस्ट वेल्फेअर असोसिएशननं अलीकडंच राज्य सरकार तसंच, अन्न व औषध प्रशासनाला याबाबत पत्र लिहिलं आहे. मनुष्यबळाची टंचाई असल्यानं अनेक वितरकांनी पुरवठा बंद केला आहे. तर, अनेक औषध निर्मिती कंपन्यांनी उत्पादनच थांबवलं आहे. मेडिकलच्या दुकानांमध्येही मनुष्यबळ नसल्यानं रोजच्या रोज वितरकांकडं जाऊन औषधं आणणं कठीण जात आहे, असं असोसिएशनचे अध्यक्ष हकीम कपासी यांनी सांगितलं. 'रक्तदाब व मधुमेहाचे रुग्ण असलेल्या आमच्या अनेक ग्राहकांकडील औषधं संपली आहेत. त्यामुळं त्यांना वेगळ्या ब्रँडची औषधं घ्यावी लागत आहेत. जीवरक्षक औषधांचा साठाही अनेकांकडं नाही, असं त्यांनी सांगितलं. वितरकांच्या अभावी मल्टिनॅशनल कंपन्यांची औषधं येणं बंद झाल्याचं दादरमधील एका केमिस्टनं सांगितलं. औषधांची अनेक गोदामं भिवंडीमध्ये आहेत. तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी बरंच अंतर कापावं लागतं. जाईपर्यंत अनेक ठिकाणी तपासणीला व अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. शिवाय, गोदामांतही औषधं घेण्यासाठी विक्रेत्यांची गर्दी झालेली असते. त्यातून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं उल्लंघन होतं. लहान बाळांसाठी लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा थांबलेला नाही. मात्र, तो नियमित नाही, असं एका केमिस्टनं सांगितलं. काहींच्या मते औषधांचा पुरवठा होत असला तरी तो वेळेवर नाही. अनेकदा विक्रेत्यांनाच वितरकांकडं जावं लागतं. ऑर्डर अधिक आणि माणसं कमी अशी परिस्थिती असल्यानं वितरकांवरही ताण आहे, असं माटुंगा येथील राकेश मेडिकलचे नरेश जैन यांनी सांगितलं. घाटकोपर येथील एका केमिस्टच्या म्हणण्यानुसार, रक्तदाब आणि मधुमेहाच्या औषधांचा तुटवडा आहे. आमचा एक वितरक धारावीतील आहे. मात्र, ते करोनाचं हॉटस्पॉट असल्यानं आम्हाला दुसऱ्या वितरकाचा शोध घ्यावा लागला.' अंधेरीतील एका केमिस्टच्या माहितीनुसार, 'बेबी फूड वगळता बाकी सगळं उपलब्ध आहे.' या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'पुरवठा साखळी पूर्ववत झाली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.'
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2xAWTtd
via IFTTT


No comments:
Post a Comment