करोना: सोलापुरात टेन्शन; १२१ जण होते मृत दुकानदाराच्या संपर्कात - Maharashtra Mazaa

Latest

Monday, April 13, 2020

करोना: सोलापुरात टेन्शन; १२१ जण होते मृत दुकानदाराच्या संपर्कात

https://ift.tt/2y7Zj2p
सोलापूर । सूर्यकांत आसबे: बसवण्णा चौक परिसरातील तेलंगी पाच्छा पेठ येथील किराणा दुकानदाराचा करोनाने बळी घेतल्यानंतर मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १२१ जणांना ताब्यात घेण्यात आले असून यातील ९१ जणांच्या घशातील स्वॅब (लाळेचे नमुने) तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. याचे रिपोर्ट लवकरच येतील, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. दरम्यान दिवसभर रिपोर्टकडे लक्ष लागलेल्या सोलापूरकरांची चिंता मात्र वाढली आहे. कोरोनामृत किराणा दुकानदाराच्या पार्थिवावर रविवारी रात्री उशिरा अक्कलकोट रोडवरील मुस्लिम स्मशानभूमीत सरकारी आदेशानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला. यावेळी प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती. रविवारी दुपारी साडेतीन वाजता किराणा दुकानदाराचा कोरोनाने बळी घेतल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिला. यानंतर काही क्षणातच आरोग्य, महापालिका आणि पोलीस यंत्रणा खडबडून जागे होत कामाला लागली. सर्वप्रथम पोलिसांच्या मदतीने तेलंगी पाच्छा पेठेकडे जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला. लोकांना घरातच थांबण्याचा सल्ला देण्यात आला. मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या घरातील मंडळी, शेजारी, नातेवाईक, वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयातील कर्मचारी, ग्राहक अशा थेट संपर्कात आलेल्या ९१ जणांना ताब्यात घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले तर अन्य ३० जणांना प्रशासनाने स्थापन करण्यात आलेल्या केंद्रात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निगराणीखाली ठेवले आहे. यातील आयसोलेशन कक्षातील ९१ जणांच्या घशातील स्वॅब वैद्यकीय अधिकार्‍यांनी चाचणीसाठी घेतले आहेत. याचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. वाचा: कोरोना बाधित होऊन मृत झालेल्या किराणा दुकानदाराच्या कुटुंबात सहा व्यक्ती राहतात. मृताच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने गेली काही महिने तो घरीच होता. तो फारसा फिरत नव्हता. कमी लोकांशी त्याचा संपर्क होता. ५ एप्रिलला प्रथम तो आजारी पडल्यानंतर नजीकच्या एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. १० तारखेला प्रकृती अधिक बिघडल्यानंतर एका सहकारी रुग्णालयात आणि तेथून लगेचच शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. या काळात ज्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या संपर्कात तो आला, त्यांचीही माहिती घेण्यात आली आहे. या व्यक्तीचा परदेशाहून आलेल्या किंवा बाधित असलेल्या कोणाशी संपर्क आला आहे का? याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या भागातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवा त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील आहे. लोकांनी घाबरुन जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये असेही आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे. २९ हजार नागरिकांची चौकशी सोमवारी दिवसभरात महापालिका व आरोग्य विभागामार्फत तेलंगी पाच्छा पेठ परिसरातील ३७०० घरांतील सुमारे २९ हजार नागरिकांची ६० पथकामार्फत चौकशी केली. या पथकात वैद्यकीय अधिकारी, आशा व अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. उद्या आणखी ३३०० घरातील १६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या चौकशीत सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असणार्‍या नागरिकांची वैद्यकीय अधिकार्‍यामार्फत तपासणी केली जात आहे. हा संपूर्ण परिसर सॅनिटायझेशन करण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे. दरम्यान तेलंगी पाच्छा पेठ परिसर सील करण्यात आला असून येथे ३०० पोलिसांचा बंदोबस्त आहे. शिवाय या परिसरावर ड्रोन कॅमेर्‍याची नजर ठेवण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3epjg5F
via IFTTT

No comments:

Post a Comment