१४ दिवस लढले; नगरमधील ८ जण करोनामुक्त! - Maharashtra Mazaa

Latest

Sunday, April 19, 2020

१४ दिवस लढले; नगरमधील ८ जण करोनामुक्त!

https://ift.tt/3ajZpBm
अहमदनगरः जिल्ह्यातील ‘करोना’बाधित असलेल्या आठ जणांनी या आजारावर मात केली आहे. यामध्ये जामखेड येथील चार, संगमनेर येथील तीन व आश्वी ब्रुदूक येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या आठही जणांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाणार आहे. आरोग्य विभागाने तशी कार्यवाही सुरू केली आहे. या आठही रुग्णांच्या चौदा दिवसांनंतर घेण्यात आलेल्या दोन्ही स्त्राव नमुना चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, ‘करोना’ आजारातून बरे होणाऱ्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १२ वर पोहोचली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी ही माहिती दिली. जिल्हा आरोग्य विभागाने पुणे येथे पाठवलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ३२ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. या अहवालामध्येच वरील आठही बाधित व्यक्तींच्या चौदा दिवसानंतर घेण्यात आलेल्या दुसऱ्या स्त्राव नमुन्यांचा अहवाल होता. या सर्व रुग्णांवर बूथ हॉस्पिटलमधील ‘आयसोलेशन वार्ड’मध्ये उपचार करण्यात येत होते. हे उपचार यशस्वी झाले असून, रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. आता पुढील १४ दिवस जामखेड येथील चारही जणांना संस्थात्मक अलगीकरणासाठी जामखेड येथे ठेवले जाणार आहे. तर, संगमनेर येथील तीन आणि आश्वी बुद्रुक येथील एक, अशा चार जणांना संगमनेर येथे संस्थात्मक अलगीकरणासाठी ठेवले जाणार आहे. या काळात आरोग्य यंत्रणेकडून त्याच्या प्रकृतीचा सातत्याने आढावा घेतला जाणार आहे. १४ जणांवर उपचार सुरू जिल्ह्यात ‘करोना’चे एकूण २८ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १२ रुग्ण बरे झाले आहेत. तर, कोपरगाव येथील एक व जामखेड येथील एक, अशा दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यात एकूण १४ ‘करोना’बाधित रुग्ण असून त्यांच्यावर ‘आयसोलेशन वार्ड’मध्ये उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयातून ही माहिती देण्यात आली.



from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cvVQK4
via IFTTT

No comments:

Post a Comment