मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्यापही कमी होत नसल्याने वाढवलेल्या ‘लॉकडाऊन’चा शेतीमालाला मोठा फटका बसत आहे. एकीकडे कोरोनाची धास्ती आणि दुसरीकडे लाखो रुपये खर्च करून जगवलेली केळी डोळ्यांदेखत फेकून देण्याच्या स्थितीत आल्याने केळी उत्पादकही अक्षरशः हतबल झाले आहेत. सध्या बाजारात मागणीच नसल्याने ३०० रुपये क्विंटल म्हणजे तीन रुपये किलो दराने केळी विकावी लागत आहे. काळजावर दगड ठेवून शेतकरी कवडीमोल भावात केळी विकण्यासाठी धडपड करीत आहेत. आतापर्यंत झालेला लाखो रूपयांचा खर्चही निघणे दुरापास्त झाला आहे. एकूणच कोरानमुळे बहुतांश शेतकऱ्यांचे जीवनच अंधकारमय झाले आहे.
गतवर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. यंदा पाण्याच्या मुबलकतेमुळे तालुक्यात १ हजार ५०० हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे. मागीलवर्षी नैसर्गिक आपत्तीसह आलेल्या विविध संकटांवर मात करून चाळीसगाव तालुक्यातील विशेषतः गिरणा पट्ट्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी टिश्यू कल्चरने केळीची लागवड केली. १४ रुपये दराने केळीचे रोप विकत आणले. दहा हजार केळीचे रोपे लावायचे म्हटले तरी त्याला रोपांसाठी निव्वळ १ लाख १४ हजारांचा खर्च आला. पुन्हा केळी वर्षभर जतन करण्यासाठी ५० हजार रुपये याप्रमाणे वर्षभरात रासायनिक खतांचे तीन डोस दिले. याशिवाय निंदणी, वखरणी असा एकूण चार ते पाच लाखांपर्यंत खर्च आला. आता हिच केळी कापणीला आली असून केळीला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, कोरोनाच्या रूपाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. २२ दिवसांपासून सुरु असलेले लॉकडाऊन आणखीन वाढवण्यात आल्याने त्याचा फटका शेतीमालाला बसला आहे.
शेतात होणार मातीमोल
‘लॉकडाऊन’मुळे केळीचा गोडवाच गायब झाला आहे. लॉकडाऊन असल्याने कोणताच केळी व्यापारी खरेदीसाठी पुढे येत नाही. आला तरी २५० ते ३०० रुपये क्विंटल या दराने केळी खरेदी करीत असतो. चांगला भाव मिळेल आणि दोन पैसे अधिक पदरात पडतील, अशी अपेक्षा केळी उत्पादकांना होती. मात्र, या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. शेतात केळी परिपक्व झाली आहे. केळी पीक अधिक काळ टिकणारे नाही. त्यामुळे बदलत्या हवामानाचा केळीला कसा फटका बसेल याचा नेम नाही. अशा परिस्थितीत मेहनत घेऊन जतन केलेल्या केळीला अत्यंत कवडीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. लाखो रुपये खर्च करून केळी जगवली. पण आता बाजारात भावच नसल्याने आणि खरेदीसाठी कोणी पुढे येत नसल्याने परिपक्व झालेली केळी शेतातच मातीमोल होते की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
केळी उत्पादकांना दिलासा द्यावा
लॉकडाऊनच्या काळात जिल्हा प्रशासनाने ज्या प्रकारे धान्य बाजारात खरेदी- विक्रीला मुभा दिली आहे, त्याच धर्तीवर केळी विक्रीसह वाहतुकीला देखील परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. उत्पादीत झालेली केळी वेळेत विकली गेली तरच शेतकऱ्यांचे कर्ज
फिटणार आहे. नुकत्याच झालेल्या कर्जमाफीमुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा डोळ्यांदेखत केळीचे नुकसान होण्याची भीती त्यांना सतावत आहे. तालुका प्रशासनाने याबाबत समन्वयाने तोडगा काढून
केळी उत्पादकांना केळी विकण्याचे परवाने द्यावेत, अशी मागणी होत आहे.
वरखेडे येथील शेतकरी बनला हतबल
वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी वामनसिंग कच्छवा यांनी त्यांच्या शेतात केळीच्या १० हजार टिश्यू रोपांची लागवड केली होती. आज त्यांचा माल कापणीसाठी तयार असून व्यापारी केळी घेण्यासाठी धजावत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत झालेला लाखोंचा खर्च वाया जाणार असल्याचे दिसत आहे. शेतात केळी कापणीला आलेली असून ती जास्त दिवस ठेवता येणार नाही. तयार झाल्यावर लगेचच विकावी लागते. आता ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढल्याने हातातोंडाशी आलेला घासच जणू हिरावला जाणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. सरकारने केळी उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा समजून त्यांना न्याय द्यावा. होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वामनसिंग कच्छवा यांनी केली आहे.
from News Story Feeds https://ift.tt/2RDb8oj
via IFTTT


No comments:
Post a Comment