सांगली: चांदोली धरणग्रस्त आणि अभयारण्य ग्रस्तांना १९९७ पासून निर्वाह भत्ता मिळाला नाही. निर्वाह भत्त्यासह प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी धरणग्रस्तांनी अनेकदा आंदोलने केली, मात्र गेली २४ वर्षे धरणग्रस्तांना केवळ प्रतीक्षाच करावी लागली. अखेर २४ वर्षानंतर ५३७ धरणग्रस्तांना चार कोटी १९ लाख रुपयांचा थकीत निर्वाह भत्ता मिळाला. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री यांच्या उपस्थितीत निर्वाह भत्त्याचे वाटप करण्यात आले. धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विशेष मोहीम राबवणार असल्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यापैकी निर्वाह भत्त्याचा प्रश्न १९९७ पासून प्रलंबित होता. अखेर पालकमंत्री पाटील यांनी थकीत निर्वाह भत्ता देऊन धरणग्रस्तांना दिलासा दिला. मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे चांदोली अभयारण्यातून पुर्नवसन केलेल्या वसाहतींमधील लोकांना निर्वाह भत्ता धनादेशाचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, 'वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्यग्रस्तांचे बहुतांश प्रश्न प्रलंबित आहेत. काही लोकांना जमिनी मिळाल्या आहेत, मात्र त्या कमी आहेत. तर अनेक लोकांना अद्यापही जमिनी मिळाल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढे यावे. करोनाचा संसर्ग कमी होताच पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा निपटारा केला जाईल.' चांदोली धरण व अभयारण्य क्षेत्रातील १८ वसाहतींचे पुनर्वसन शिराळा, वाळवा व मिरज तालुक्यांमध्ये केले आहे. या पुनर्वसित लोकांना १९९७ पासून थकीत असलेला निर्वाह भत्ता देण्यात आला. पालकमंत्री पाटील यांनी १८ वसाहतींमधील ५३७ खातेदारांसाठी चार कोटी १९ लाख ४५ हजार ७७२ रूपयांचा निधी मंजूर करून आणला. लाभार्थ्यांना धनादेशाव्दारे याचे वाटप करण्यात आले. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर निर्वाह भत्ता हाती पडल्यानंतर यापुढे तरी सरकारने वेळेत दखल घ्यावी, अशी अपेक्षा धरणग्रस्तांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, 'धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांचे प्रश्न अनेक वर्षांपासून रखडले होते. काही लाभार्थ्यांना जमीन मिळाली. काहींना कमी जमीन मिळाली आहे. ज्यांना अद्याप जमीन मिळाली नाही, त्यांची माहिती घेतली जात आहे. वसाहतींमध्ये नागरी सुविधांचा प्रलंबित प्रश्नही मार्गी लावला जाईल.' कार्यक्रमासाठी मिरज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर, चांदोली अभयारण्य विभागीय वनअधिकारी एम. मोहिते, सहायक वनसंरक्षक जी. आर. चव्हाण, आदी उपस्थित होते.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2GDG3xQ
via IFTTT


No comments:
Post a Comment