कोल्हापूर - ""कोरोना कक्षात काम करणाऱ्यांसाठी स्वतंत्र शौचालय नाही, दुसऱ्या डिपार्टमेंटला जायचं तर एकदा किट काढले, की पुन्हा मिळणार नाही ही भीती. त्यामुळे ब्लॅडरला गपगुमान बस बाबा, म्हणून आम्हीच धमकी दिलेली. जेवणाचे नावच काढायचे नाही, ड्यूटी संपल्यावर किट काढायचे. युनिफॉर्म बदलायलाही खोली नाही. काचेच्या दरवाजावर ब्लॅंकेट टाकून बंद करायचे व खाली बसून कपडे बदलायचे.'' ही व्यथा आहे, सीपीआर रुग्णालयाच्या कोरोना कक्षात काम करणाऱ्या परिचारिकांची.
एका परिचारिकेने फेसबुकवरून ही व्यथा जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, ती लिहिते,"" फेब्रुवारीअखेरीस कोरोनाबद्दल चर्चेला सुरवात झाली. डॉक्टरांना प्रशिक्षण दिले पण, परिचारिकांना नाही, मग गुगलवरून माहिती घेतली. मार्चमध्ये रुग्णालयात कोरोना स्पेशल वॉर्ड केले. विभागाच्या सर्व नर्सना तिकडे ड्युटी दिली. पहिल्यांदाच हे सगळं घडत असल्यामुळे किट नव्हतेच. पहिले काही दिवस तसेच काम केले. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली माहिती वाचल्यानंतर मात्र पायाखालची जमीनच हादरलीच. दुसऱ्या दिवशी किटशिवाय ड्यूटी करणार नसल्याचे सांगितल्यावर किट मिळाले. पण किटचा साईज L होता व माझा साईज XXL. कसेबसे स्वतःला त्या किटमधे फिट केले. पुरुष सहकारी फारच अवघडून गेले. घालतानाच किट फाटल्या. किटची साईज लहान त्यात टोपी असल्यामुळे मान हलवता येत नव्हती. किटमुळे प्रचंड गरम होते. फॅनची व्यवस्था नाही. तोंडावर N95 मास्क घट्ट घातलेला. नाक पूर्ण बंद झाल्याने व मास्कची सवय नसल्यामुळे गुदमरत होते. कोरोना कक्षाबाहेर तपासणी, रजिस्टरमध्ये नोंदी, वरिष्ठांना अहवाल हे काम होतेच. हाताच्या अंतरावरील उभ्या पेशंटपैकी बाधित कोण? याचा अंदाज बांधता येत नव्हता. संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्याचे काम करावे लागे. आतमध्येही अशीच परिस्थिती. संशयित रुग्ण ऍडमिट केलेले. योग्य साईजचे किट नसल्याने सर्व ब्रदर व सिस्टरना चालताना अडचण येत होती. अवघडलेल्या स्थितीत औषध, गोळ्या, इंजेक्शन द्यावे लागे, हात साबणाने धुवा, सॅनिटायझर लावा, मास्क लावा, असे सारखे सर्वांना सांगायचे. घरी आले की मुलीला डेटॉलचे पाणी साबण व सॅनिटायझर घेऊन बिल्डिंग खाली बोलवायचे. आधी स्वच्छ हातपाय धुवायचे. शुज धुवायचे, गाडी धुवायची. मग चप्पल बदलून बिल्डिंगमध्ये जायचे. गाडीची चावी, मोबाइल, चष्मा, पेन व आयकार्ड एका बॉक्समधे टाकायचे. बाथरुम गाठून बॅग, कपडे, युनिफॉर्म गरम पाण्याने धुवायचे. डेटॉलमधे भिजत ठेवायचे आणि अंघोळ करूनच बाहेर पडायचे. बाहेर आले की वेगळं बसायचं. तहानेने जीव व्याकुळ व्हायचा. जेवणाची इच्छा व्हायची नाही. प्रतिकार शक्ती राखण्यासाठी घरचे अन्न खायचे. दुसऱ्या दिवसापर्यंत वेगळं बसायचं.
आणि काळजात चर्रर झालं!
गेल्या आठवड्यात सरकारने आपत्कालीन कर्मचाऱ्यांना विम्याची घोषणा केली व या आठवड्यात फॉर्म आले. पहिल्याच पानावरील नाव व बाकीची माहिती झाल्यावरचा कॉलम "मृत्यू दिनांक व वेळ' वाचलं अन् काळजात चर्रर झालं. "सोडून दे, ती नोकरी नको हा विमा आपल्याला, ही मुलीची विनंती. पण या विम्यापेक्षाही मोठे आहे ते माझे "कर्तव्य'. मला लढत लढत वीरमरण प्राप्त झाले तरी हरकत नाही, असे मुलीला समजावून सांगितले.
हे पण वाचा - पती नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीती वाटू लागली म्हणून तिने आपले घर गाठले; पण...
जिंकण्याची जिद्द बाळगूया
पैशासाठी करिअरच्या मागे धावणाऱ्यांना मुलाबाळांचे सुख मिळावे म्हणूनच देवाने हे योजले असावे. हा लॉकडाउनचा फायदाही आहेच ना. नोकरीनिमित्त घरच्यांशी स्वतःशी संवाद साधता येत नाही, म्हणून रडणारे बरेचजणं होते. त्यांच्यासाठीच हा सुवर्णकाळ. तुम्ही सगळे कोरोनामुक्त झाला म्हणजे नर्स, डॉक्टर, सफाई कामगार, पोलिस व इतर पडद्यामागे राबणारे हात तणावमुक्त होतील. एकच विनंती सर्वांनी घरीच थांबूया...
हे पण वाचा - गंगातीर्थक्षेत्र बंद ; गंगाक्षेत्रामध्ये भाविकांना यावर्षी पवित्र स्नान नाहीच....
from News Story Feeds https://ift.tt/2z8Tr9F
via IFTTT


No comments:
Post a Comment