बीड: लॉकडाऊनमुळं घरापासून दूर अडकून पडलेल्या व अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या बिकट परिस्थितीकडं भाजपच्या नेत्या व माजी मंत्री यांनी सरकारचं लक्ष वेधलं आहे. ट्विटरवर फोटो पोस्ट करून त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. 'सर्व शिस्त पाळून आणि कष्ट करूनही त्यांच्या ताटात माती का,' असा प्रश्न त्यांनी सरकारला केला आहे. ऊसतोड कामगारांसाठी पंकजा मुंडे सातत्यानं आवाज उठवत आल्या आहेत. याआधीही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी या कामगारांच्या संदर्भात चर्चा केली होती. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं होतं. सध्या लॉकडाऊनमुळं अनेक कामगार घरापासून दूर असून आयसोलेशन कॅम्पमध्ये राहत आहेत. मात्र, अवकाळी पावसामुळं त्यांचे हाल होत आहेत. तब्बल १५ दिवस ते एका ठिकाणी आहेत. कुणी साधा शिंकलाही नाही. मग चिंता कसली आहे? आम्हाला श्रेय नको पण निर्णय घ्या, असं ट्विट पंकजा यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. आता पुन्हा एकदा पंकजा यांनी ट्विट करून निर्वाणीचा इशारा दिलाय. ट्विटमध्ये त्या म्हणतात, 'इथं लेकरांच्या जेवणात चिखल आहे. कुडं पडली आहेत. धान्य भिजलंय. त्यांचे हाल पाहून आज माझ्याही गळ्याखाली अन्न गेलं नाही. सर्व शिस्त पाळून, कष्ट करून त्यांच्या ताटात माती? सर्व शिस्त पाळूनही बिचारे आयसोलेशननं आजारी पडतील. ते करोनाच्या कुठल्याही 'हॉटस्पॉट'मध्ये नाहीत. 'हॉटस्पॉट'च्या जवळपास जाण्याचाही प्रश्न नाही. मग त्यांच्या बाबतीत निर्णय घ्यायला काय अडचण आहे? आता बस्स झालं! उद्याच्या उद्या त्यांची घरी जाण्याची व्यवस्था करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Vz8h0O
via IFTTT


No comments:
Post a Comment