जळगाव : "कोरोना' रुग्णाची चाचणी करण्याची सुविधा जळगावात उपलब्ध नसल्याने स्वॅब नमुने तपासणीसाठी धुळे किंवा पुणे येथे पाठवावे लागत होते. मात्र आता शासनाने जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात चाचणी करण्यास मंजुरी दिली आहे. या प्रयोगशाळेची लवकरच उभारणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबतची मागणी केली होती. त्याला शासनाने मंजुरी दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक व्हीडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून नुकतीच पार पडली. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयातून या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी जळगाव जिल्ह्यात "कोरोना' रुग्णाची चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मागणीला तत्त्वतः: मान्यता दिली होती. आता ही मागणी मान्य करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये या विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या राज्यातील सहा शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोनाची चाचणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. जळगावसह बारामती, कोल्हापूर, गोंदिया, नांदेड आणि अंबाजोगाई येथील रुग्णालयांमध्येही आता कोरोना चाचणी होणार असून याबाबतचे परिपत्रकदेखील जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना चाचणीसाठी जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजना, स्वीय प्रपंची खाते व महात्मा फुले जनआरोग्य योजनांच्या अंतर्गत निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या प्रयोगशाळेसाठी लागणारी सामग्री ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही यात म्हटले आहे.
याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे, की कोरोना चाचणीची सुविधा जळगावात उपलब्ध झाल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांचे निदान करण्यासाठी आता जास्त वेळ लागणार नाही. यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य होतील. तसेच कोरोना विरोधी लढ्यास बळ मिळेल.
from News Story Feeds https://ift.tt/2Ve63oI
via IFTTT


No comments:
Post a Comment